इस्लामपूर : येथील भूमिअभिलेख कार्यालयात जागेच्या वादातील सुनावणी सुरू असतानाच मुस्लीम समाजातील दोन गट एकमेकास भिडल्याने गदाराेळ झाला. एकमेकाच्या अंगावर खुर्च्या घेऊन धावून जात हाणामारी झाली. यामध्ये एकास गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारी घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
साबिक इब्राहिम मोमीन (वय ३८, रा. मोमीन मोहल्ला, इस्लामपूर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या हाणामारीने प्रशासकीय कार्यालयाचा परिसरात गोंधळ उडाला होता. या हाणामारी वेळी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक आणि कार्यालयातील एका महिलेस ही धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप जखमी तरुणाच्या गटाकडून करण्यात आला.
भूमिअभिलेखच्या कार्यालयात उपअधीक्षक अशोक चव्हाण यांच्यासमोर जागा वादातील सुनावणी सुरू होती. त्यावेळीच त्यांच्या कक्षामध्ये सोमवारी दुपारी ही हाणामारी झाली. जखमी साबिक मोमीन हे पोलिसात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यांची फिर्याद घेण्याऐवजी तक्रार घेत त्यांना पिटाळण्यात आले.
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी
आकीब जमादार आणि अहमद इबुसे यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. त्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पोलिसांनी दोन्ही गटांना योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याची समज दिली आहे.