थंडी, तापाच्या रुग्णांना सर्व तपासण्या कराव्या लागत आहेत. बहुतांश लोक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, डेंग्यूसदृश साथ सुरू असल्याची माहिती नगरपंचायतीस दिली आहे. साठून राहिलेल्या पाण्यावर फवारणीच्या सूचना दिल्या आहेत. फवारणीसाठी डास निर्मूलन कीटकनाशक व रसायनही दिले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांवर शक्य होणारे उपचार करत आहोत.
सध्या खानापूर शहरात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहत आहे. प्रभाग नऊ व अकरामध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथून सुरुवात झालेल्या डेंग्यूसदृश साथीने आता शहरामध्ये सर्वत्र पाय पसरले आहेत. रस्त्यांच्या व गटार बांधकामामुळे पाणी साठून राहत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपंचायतीने दोन-तीन वेळा औषध फवारणी तसेच कीटक प्रतिबंधक धूर फवारणी केली आहे. तरीही, परिस्थितीत सुधारणा नाही. रोजच्या रोज औषध फवारणी तसेच साठलेल्या पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे.