सांगली : मुंबईतबेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून एसटीचे दोनशे चालक व वाहक रवाना झाले. दोन महिन्यांपूर्वीही कर्मचारी गेले होते, मात्र त्यातील शंभरावर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने गहजब निर्माण झाला होता.मुंबईत लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नाही. त्याचा मोठा ताण बेस्ट प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून एसटी गाड्या व कर्मचाऱ्यांची मागणी बेस्टने केली आहे. त्याला प्रतिसाद देत सांगली, पुणे, जळगाव आणि नांदेड विभागातून एसटी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. २३ डिसेंबरपर्यंत ते मुंबईत सेवा देतील.
गेल्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची चांगली व्यवस्था न झाल्याने बराच दंगा झाला होता. आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी लॉज उपलब्ध केले आहेत. जेवणाची जबाबदारी बेस्ट किंवा एसटीने घेतलेली नाही, त्याऐवजी दररोजच्या दोनवेळच्या जेवणासाठी २२५ रुपयांचा भत्ता दिला आहे.सांगली जिल्ह्यातून रविवारी (दि. ६) १०० चालक, १०० वाहक व सहा पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी मुंबईसाठी रवाना झाले. ते मुंबईत प्रतिक्षानगर आगारात काम करतील. सांगली आगारातून ४०, मिरजेतून ४० व अन्य आगारांतून १२० असे २०० चालक-वाहक गेले आहेत. सोमवारी (दि. ७ ) पहाटे पाच वाजल्यापासून त्यांची ड्युटी सुरु होईल.कोरोनाच्या सावटाखाली काम करणारगेल्यावेळी मुंबईत सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे या खेपेस काळजी घेतली आहे. ५५ वर्षांखालील कर्मचाऱ्यांनाच पाठविले आहे, शिवाय ते निर्व्यसनी असतील याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. राहण्यासाठी हॉलऐवजी लॉजमध्ये स्वतंत्र खोल्या दिल्या असून जेवणाची निवड कर्मचाऱ्यांवरच सोपविली आहे.