सांगली : तासगावचे राष्ट्रवादी नेते अविनाशकाका पाटील व भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाची समझोता एक्स्प्रेस जिल्हा गणपती संघाच्या निवडणुकीत धावल्याने संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत सोमवारी १५ जागांसाठी एकूण १८ अर्ज दाखल झाले आहेत. यातील १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत.गणपती जिल्हा संघाची यंदाची निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. संजयकाकांचे सख्खे चुलत बंधू अविनाशकाका पाटील यांच्या गटाने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. अचानक दोन्ही काकांच्या गटाननी समझोता केला आणि संघाची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने धावत आहे.सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत २० अर्ज दाखल झाले. यात दोन उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. संस्था गटाच्या निवडणुकीत तीन जागांसाठी एकूण सहा अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अजून असल्याने बिनविरोधचे संकेत या दोन्ही गटांकडून मिळत आहेत. महिला प्रतिनिधी गट, मागासवर्गीय, ओबीसी, तसेच खुल्या गटातील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. (प्रतिनिधी)तासगावात उलट-सुलट चर्चा राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून अविनाशकाका पाटील यांची ओळख आहे. तासगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणावरून अविनाशकाका व संजयकाका या चुलत बंधूंमध्ये संघर्ष सुरू झाला. तो आजअखेर कायम आहे. दोन्ही नेत्यांमधून विस्तव जात नसताना, अचानक गणपती संघात त्यांनी केलेल्या समझोत्याने राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.संस्था गटाच्या तीन जागांसाठी ६ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये दोन्ही काका गटांमधील सुनील जगन्नाथ जाधव (हातनोली), युवराज पाटील (आरवडे) आणि मारुतराव हिंगमिरे (मणेराजुरी) यांचे, तर अन्य तिघांमध्ये सुनंदा दीपक पाटील, दत्तात्रय अर्जुन येळावीकर, रामचंद्र विष्णू पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या गटातील उमेदवारांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणपती संघात दोन काकांचा समझोता
By admin | Published: March 14, 2016 11:03 PM