कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील हनुमान देवाचा जन्मकाळ मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता साजरा झाला. तब्बल दोन किलोच्या सोन्यापासून बनवलेल्या पाळण्यात हनुमंताचा जन्मोस्तव झाला. यासाठी दीड कोटी रुपयांची लोकवर्गणी गोळा करण्यात आली. ६०० माहेरवाशीणींनीही त्यासाठी योगदान दिले.दोन महिन्यांपूर्वी यात्रा समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी येणारा हनुमान जयंती सोहळा सोन्याच्या पाळण्यात साजरा करणार असल्याचे सांगितले होते. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची तयारीही केली होती. माहेरवाशिणींनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत आतापर्यंत सहाशे माहेरवाशिणींनी मदत केली. ग्रामस्थांनीही लोकवर्गणी दिली. त्यातून सुवर्ण पाळणा तयार करण्यात आला. काल, सोमवारी (दि .२२) सायंकाळी या पाळण्याची ढोलताशांच्या गजरात घोड्यांच्या रथातून गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमासाठी माहेरवाशिणींना खास आमंत्रण होते. आज, मंगळवारी पहाटे साडेसहा वाजता जन्मोत्सव झाला. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी पालखी मिरवणुक निघाली. रात्री शोभेच्या दारूच्या आतषबाजीचे नियोजन आहे.
Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च
By संतोष भिसे | Published: April 23, 2024 6:18 PM