सांगली : येथील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर मालवाहतूक छोटा हत्ती आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन ठार झाले तर २१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना तात्काळ सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इर्शाद नदाफ (वय ३३, रा. कसबे डिग्रज) व सुभद्रा अर्जुन येळावीकर (७८, रा. तुंग) अशी मृत दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहतूक टेम्पो (क्रमांक एमएच १० एक्यू ५०३३) हा मिरज तालुक्यातील तुंग येथून भजनी मंडळातील सदस्यांना घेवून शिरोळकडे जात होता, तर चारचाकी (क्रमांक एमएच १० डीएल २८८६)सांगलीहून डिग्रजकडे चालला होता. या दोन्ही गाड्याचा वेग प्रमाणापेक्षा अधिकचा होता. आयर्विन पुलावर या दोन्ही गाड्या समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या दोन्ही गाड्याचे समोरील बाजू चक्काचूर झाली आहे. या गाडीमध्ये असणाऱ्या सर्वांना या अपघातानंतर जोरदार मार बसला आहे. यातील अनेकजणांना तर मुर्छा आली होती. त्यामुळे या जखमींना बाहेर काढणाऱ्यांनाही धक्का बसला.
छोटा हत्तीमध्ये आणि चारचाकी वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसले असल्याचे समोर आले आहे. या अपघातानंतर बघ्याचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जखमींना तात्काळ उपचारासाठी नेणेही अवघड बनले होते. या अपघाताची माहिती समजताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते याठिकाणी जमा झाले आणि त्यांनी तात्काळ या जखमींना बाजूला काढून रुग्णवाहिकेमधून वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. चारपेक्षा अधिक रुग्णवाहिकेमधून या जखमींना वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात आणल्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला.यामध्ये सिरीयस जखमी कोण आणि कोण कोणत्या वाहनामधून प्रवास करत होते, याची कोणतीही माहिती कोणालाच मिळत नव्हती. डॉक्टरांच्याकडून या जखमीवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मृतांची ओळख नाही या अपघातात एक महिला व एक पुरुष ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पण त्यांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. हे दोघे कोणत्या वाहनात होते याचीही माहिती मिळू शकली नाही. .