सातारा : शेतकऱ्यांना बनावट पाणी परवाने वितरित करून २ लाख १६ हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कृष्णानगर येथील सिंचन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे (रा. राजगृह, सत्यमनगर, कोरेगाव रोड, खेड, ता.सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत कृणानगर येथील जलसंधारण विभागातील सुजित आंबादास कोरे (वय ५८, रा. वनवासवाडी, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लिपिक संजय कांबळे याच्याकडे कृष्णानगर येथील सिंचन शाखेचा २०१६ ते २०१९ या कालावधीत पद्भार असताना स्वत:च्या सह्या करून बनावट पाणी परवाने व नवीन विद्यूत यंत्र परवाने शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
ही बाब काही दिवसांपूर्वी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांमुळे उघडकीस आली. त्यावेळी अधिकाºयांनी सर्व माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या. कांबळे याने पावती पुस्तक अनाधिकाराने आपल्या ताब्यात ठेवले. या पावती पुस्तकाद्वारे २ लाख १६ हजार ४१ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु या रकमेचा भरणा शासनाच्या खात्यामध्ये केला गेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
कांबळे याने शासनास फसविण्याच्या हेतूने खोटे व बनावट पाणी परवाने व पावत्या तयार करून लाभार्थी शेतकऱ्यांकडून रक्कम स्वीकारल्या. अधिकार नसताना सह्या करून शेतकऱ्यांना पावत्या दिलेल्या आहेत. हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर जलसंधारण विभागाचे सुजित कोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत कांबळे याला अटक झाली नव्हती.