सांगली : विनापरवाना पिस्तूल व शस्त्र बाळगणाºया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. वाळवा फाटा येथे केलेल्या या कारवाईत अंकुश दाजी गाडवे (वय २८) व सुजिर भिवा भिसे (२४, दोघेही रा. सिध्दापूर, भिसेवाडी, जि. विजापूर) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून पिस्तूल, जिवंत काडतूस, चाकू असा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्'ातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पथक इस्लामपूर परिसरात पेट्रालिंग करीत असताना, कर्मचारी अशोक डगळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोटारसायकल (क्र. केए इजे ७०६१) यावरुन दोघे सांगली मार्गे वाळवा फाटा येथे येणार असून त्यांच्याजवळ पिस्तूल आहे. माहितीनुसार वाळवा फाटा येथे सापळा लावून दोघा संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, गाडवे याच्या कमरेला ५० हजार रूपये किमतीचे एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस व मोबाईल, तर सुजिर भिसे याच्याकडे धारदार चाकू, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल मिळाला.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक डगळे, सचिन धोत्रे, वैभव पाटील, संकेत कानडे, सलमान मुलाणी, ऋषिकेश सदामते यांनी ही कामगिरी पार पाडली.