मिरज : म्हैसाळ येथील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी चार एजंटांना अटक करण्यात आली आहे. मृत विवाहितेचा पती प्रवीण जमदाडे याची न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढविली आहे. मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात व तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती प्रवीण जमदाडे अटकेत आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत दि. १७ मार्चपर्यंत तीन दिवसांची वाढ केली. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रूग्ण आणणाऱ्या सातगोंड पाटील, यासिन तहसीलदार,संदीप विलास जाधव, वीरेनगोंडा रावसाहेब गुंमटे या चार एजंटांना यापूर्वी अटक केली आहे. पोलिसांनी आणखी दोन एजंटांना ताब्यात घेतल्याने एजंटांची संख्या सहावर गेली आहे. म्हैसाळ प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक दीपा काळे यांनी अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टरांची होमिओपॅथी कौंन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत चौकशी केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी काही डॉक्टरांची पोलिसांना माहिती मिळाली असून, त्यांचा शोध सुरू आहे. डॉ. खिद्रापुरे याच्याकडून गर्भपात करणाऱ्या महिला रुग्णांची पोलिसांना यादी मिळाली असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील अकरा आरोपींना अटक झाली असून, आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. डॉक्टर पत्नीची मुक्ततापोलिसांनी डॉ. खिद्रापुरे याच्या डॉक्टर पत्नीस ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने पतीच्या कृत्यात सहभागी असल्याचे नाकारले आहे. यामुळे पोलिसांनी डॉक्टर पत्नीची मुक्तता केली. डॉ. खिद्रापुरे याने कर्नाटकातील कागवाड, विजापूरसह आणखी काही ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून म्हैसाळ येथे गर्भपात करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. खिद्रापुरे हा मद्याच्या नशेत रात्रीच्या वेळी गर्भपात करीत होता. पतीच्या कृत्यात सहभागी असल्याचा पुरावा मिळाल्यास डॉक्टर पत्नीविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर ताब्यातअटकेत असलेला खिद्रापुरे व त्याच्या एजंटाच्या चौकशीतून शिरोळ तालुक्यातील एका डॉक्टरचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी शिरोळ पोलिसांची मदत घेऊन या डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरु होती. आतापर्यंतच्या तपासात कर्नाटक व कोल्हापूर जिल्हा ‘कनेक्शन’ स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकातील एका महिला डॉक्टरलाही ताब्यात घेतले होते, पण चौकशी करुन तिला सोडून देण्यात आले. शिरोळच्या या डॉक्टरचा नेमका काय सहभाग आहे, याची माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. वकीलपत्र घेऊ नका : महिला काँग्रेसची मागणीमहिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिरजेत वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन म्हैसाळ प्रकरणातील आरोपी डॉ. खिद्रापुरे व त्याच्या साथीदारांचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी केली. प्रतीक्षा सोनवणे, सुनंदा खराडे, लता कोळी, गौराबाई भोरे, शेषाबाई कदम, शोभा झांबरे, विमल कदम, शिवलीला छलवादी, सुशीला दोडमणी यांनी वकील संघटनेचे अॅड. एम. ए. शेख, अॅड. सी. ए. पाटील, अॅड. एस. के. घेवारे, अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड. राजू शिरसाट यासह पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आणखी दोन एजंट ताब्यात
By admin | Published: March 15, 2017 12:28 AM