लोकमत न्यूज नेटवर्कसांगली/कडेगाव : जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ने सोमवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. आठवड्यातील हा चौथा बळी आहे. हणमंत दिनकर कदम (वय ४०, रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव) व राजाराम शिवाप्पा म्हेत्रे (४५, श्री कॉलनी, पलूस) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात अकराजणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हणमंत कदम तीनचाकी रिक्षाने मालवाहतुकीचा व्यवसाय करत होते. २४ जुलैपासून त्यांना ताप व सर्दीचा त्रास सुरु होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी उपचार करुन घेतले. पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना कºहाड (जि. सातारा) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या थुंकी व घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर कºहाड येथे उपचार सुरू होते. परंतु सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करुन त्यांच्यावरही औषधोपचार करण्यात आले.पलूसचे राजाराम म्हेत्रे गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी होते. खासगी रुग्णालयात औषधोपचार घेऊनही त्यांना ताप कमी आला नाही. त्यांची प्रकृती खालावतच गेल्याने खासगी डॉक्टरांनी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याच्या शक्यतेने पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी त्यांच्या थुंकी व घशामधील स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविले; मात्र सायंकाळी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या तपासणीचा अहवाल मंगळवारपर्यंत प्राप्त होणार आहे. स्वाइन फ्लू संशयित म्हणून त्यांच्या मृत्यूची नोंद आहे.
‘स्वाइन फ्लू’ने आणखी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:19 AM