मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूंसह १३ जणांना अटक केली आहे, तर छातीरोग तज्ज्ञ डाॅ. शैलेश बरफे याच्यासह नरेंद्र जाधव व बाळू सावंत या दोन रुग्णालय कर्मचाऱ्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अॅपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल २०५ पैकी ८७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चाैकशीत निष्पन्न झाले आहे; मात्र डाॅ. जाधव याने मृत रुग्णांचे रेकॉर्ड ठेवले नसल्याने व रुग्णांवर उपचार केलेल्या कागदपत्रांवर कोणाच्याही मृत्यूची नोंद नसल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. यामुळे अॅपेक्स प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाशी संबंधित मंडळी धास्तावली आहेत.
महापालिकेने अॅपेक्स कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर तेथे नियमित भेटी देऊन तपासणीची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेतील पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनीही आपली जबाबदारी टाळल्याचे निष्पन्न होत असून डाॅ. जाधव याच्या गैरप्रकारात सहभागी झाल्याबद्दल संबंधितांनाही पोलिसांच्या चाैकशीला तोंड द्यावे लागणार असल्याची माहिती मिळाली.