सांगली: साेलर जोडणीची फाईल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ४५ हजारांची लाच स्वीकारताना ‘महावितरण’च्या दोन अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. उप कार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर (वय ४०, रा. कासार गल्ली, सोमवार पेठ, तासगाव) व सहायक अभियंता सागर विलास चव्हाण (३४, रा. नवेखेड, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूस येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदाराची सोलर जोडणीची कंपनी आहे. या कंपनीच्या वतीने जोडण्यात आलेल्या सोलर इन्टॉलेशनची फाईल मंजुरीसाठी पलूस उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अतुल पेठकर व सहायक अभियंता सागर चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपतकडे याची तक्रार केली.लाचलुचपतच्या पडताळणीत पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले हाेते.
त्यानुसार बुधवारी महावितरणच्या पलूस उपविभागीय कार्यालयात लाचलुचपतने सापळा लावला असता, उप कार्यकारी अभियंता पेठकर याने लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. यानंतर सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांवरही पलूस पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, वीणा जाधव, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.