लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणासह अन्य एका गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पसार असलेल्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. संजय गुलाबचंद गिडवाणी (२८, रा. रेव्हेन्यू कॉलनी, चांदणी चौक, सांगली) व सुनील सतीश गुरव (२१, रा. गल्ली क्रमांक ६, रामनगर, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
विविध गुन्हयांमध्ये पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीने एक खास पथक तयार केले आहे. सांगली परिसरात हे पथक गस्तीवर असताना, त्यांना हे पसार संशयित हाती लागले.
संशयित संजय गिडवाणी हा आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून हवा होता. शहरातील चांदणी चौक परिसरात तो थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.
दुसऱ्या तपासणीत गेल्या दोन वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेला सुनील गुरव हा रामनगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. दोन गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सुधीर गोरे, संजय कांबळे, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.