सांगली : कोरोनाच्या नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने अखेर रविवारी सांगलीत शिरकाव केला. शहरातील शंभरफुटी रोडवरील गुलाब कॉलनीतील पती-पत्नीचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे, कोणताही परदेशी प्रवास केलेला नसतानाही हा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, दोघांनाही कोणताही त्रास नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील गुलाब कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नींना कोरोनाची लक्षणे वाटू लागल्यानंतर, २५ डिसेंबर रोजी एका खासगी प्रयाेगशाळेत केलेल्या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर, या लॅबने हा अहवाल ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठविला होता. रविवारी सायंकाळी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोघांनाही ओमायक्रॉनचे निदान झाले आहे.
राज्यभरात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना, सांगलीत रुेग्ण आढळले नव्हते. प्रशासनानेही खबरदारी घेत उपाययोजनांवर भर दिला होता. असे असतानाही रविवारी एकाच वेळी दोन ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने यंत्रणा तातडीने सतर्क झाली.
सांगलीत आढळलेल्या दोन्ही रुग्णांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर, त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी जिनोम सिक्वोसीन अहवाल आला. त्यात दोघांनाही ओमायक्रॉनचे निदान झाले. कोरोना चाचणी झाल्यापासून हे पती-पत्नी होम आयसोलेशनमध्ये होते. त्यांना कोणताही त्रास नसून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दोघांचे दोन्ही डोस पूर्ण
आरोग्य विभागाकडून आता या दोघांच्या संपर्कात आलेले डॉक्टर, घरातील व्यक्ती व इतर व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दोघांचाही कोणताही प्रवासाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.