सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कासेगाव येथे सापळा रचून कऱ्हाड येथील तरुणाकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. प्रवीण खाशाबा जाधव (वय ३७ रा. कराड, जि. सातारा ) असे संशयिताचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी त्यासाठी विशेष पथक नियुक्त केला आहे. कासेगाव परिसरात एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना एका तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात सापळा रचला. अष्टविनायक फॅब्रिकेटर्सच्या समोर एकजण पिशवी घेऊन संशयास्पदरित्या वावरताना पोलिसांना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या पिशवीत असलेली दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. ही पिस्तूल त्याने आटपाडी येथील परशुराम करवले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलीस चौकशीत संशयित प्रवीण याच्याकडे बंदूक वापरण्यासाठी आवश्यक असणारा शासकीय परवाना नसल्याचे आढळले. संशयित प्रवीण याच्याविरोधात कासेगाव पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.