सांगली : औद्योगिक वसाहतीतील बसथांब्याजवळ संशयास्पदरित्या थांबलेल्या सुरज गणपत चव्हाण (वय २६, रा. रेठरे बुद्रुक, रेठरे कारखान्यानजीक ता. कराड, जि. सातारा ) आणि मंथन मोहन गायकवाड (वय २२ रा. हडपसर, गोपाळ पट्टी पुणे, ता. हवेली, जि. पुणे ) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुल, ६० हजाराचा महागडा मोबाइॅल असा १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजयनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी आकाश गायकवाड यांना खबऱ्यांमार्फत दोघे युवक ज्युबिली कारखाना ते आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बस थांब्यावर संशययास्पदरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. संजयनगर ठाण्याचे निरिक्षक बयाजीराव कुरळे यांना याबाबत माहिती दिली. परिसरात सापळा रचून पथकाने संशयित दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता दोघांकडे ५० हजार रुपयाचे किंमतीची देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जीवंत काडतुसे, ६० हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ६ हजार रुपयांचा मोबाईल आणि बॅग असा मुद्देमाल मिळून आला.पिस्तुलासंदर्भात दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्याकडे शस्त्र परवाना देखील नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघा संशयितांना शस्त्र अधिनियम कलम ३ अन्वये अटक केली आहे. निरीक्षक कुरळे, कर्मचारी कपिल साळुंखे, दिपक गायकवाड, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, आकाश गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिस उपनिरिक्षक डी. आर. सय्यद तपास करीत आहेत.
सांगलीत दोन पिस्तुले जप्त, दोघांना अटक; संजयनगर पोलिसांची औद्योगिक वसाहतीत कारवाई
By घनशाम नवाथे | Published: March 05, 2024 1:18 PM