सांगली : मणेराजुरी (ता.तासगाव) येथील बांधकाम व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. संजय अजय पाटील (वय २८, रा. मिरज), विनित विशाल कांबळे (वय १९, रा. कवलापूर, ता मिरज) अशी त्यांची नावे आहेत. जबरी चोरीचा हा प्रकार कुपवाड येथे रविवारी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मणेराजुरी येथील योगेश जगन्नाथ वाघमारे (वय २९) यांचा बांधकाम व्यवसाय आहे. रविवारी सकाळी वाघमारे यांना एका इसमाने फोन करून प्लाॅट दाखवतो, असे म्हणून कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या गुलमोहर काॅलनीजवळ बोलावून घेतले. वाघमारे गुलमोहर काॅलनीजवळ आल्यावर चार इसम चारचाकी वाहनातून (एम.एच.०५ - ७५७५) त्या ठिकाणी आले. वाघमारे यांना तुम्हाला प्लाॅट दाखवतो, असे म्हणून मोकळ्या रानात घेऊन गेले. यातील दोघांनी वाहनातून आणलेल्या बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळचा मोबाईल आणि १३ हजाराची रोकड असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली होती.
या जबरी चोरीचा छडा लावण्याचा आदेश एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिला. त्यासाठी सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांचे एक पथकही नियुक्त केले. पथकातील पोलीस नाईक सागर टिंगरे यांना ही चोरी संजय पाटील व विनित कांबळे या दोघांनी केली असून, हे दोघे सावळी फाटा येथे थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने या दोघांना सावळी फाटा येथे ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, वाघमारे यांचा मोबाइल त्यांच्याकडे मिळून आला. दोन्ही संशयितांना कुपवाड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.