लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वेगवेगळ्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पसार असलेल्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कवलापूर व विटा येथे अटक केली. संदीप दिलीप तायडे (वय ४५, रा. कवलापूर ता.मिरज) व लखन रामचंद्र ठोंबरे (वय २९ रा. पंचशीलनगर, विटा) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना सांगली ग्रामीण व विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर होते. पहिल्या कारवाईत विटा येथे तीन वर्षांपूर्वी मारामारीच्या गुन्ह्यातील लखन ठोंबरे हा घरी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घरात जाऊन कारवाई करत त्यास विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सांगली परिसरात गस्तीवर असलेल्या पथकाला माहिती मिळाली की, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील संदीप तायडे हा घरी आला आहे. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करत ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.