जत : निगडी खुर्द (ता. जत) येथे १३ जानेवारी रोजी रात्री झालेल्या तीन घरफोड्या उघडकीस आणून जत पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. अण्णासाहेब भाऊसाहेब गायकवाड (वय २०), सचिन दत्तात्रय काशीद (२७, दोघे रा. निगडी खुर्द) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पूजा सुरेश जाधव (रा. निगडी खुर्द) यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
दोघा संशयित आरोपीने १३ जानेवारी रोजी रात्री जाधव यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची आतील कडी उचकटून घरात प्रवेश केला. घरातील ४५ हजार रुपये रोख व १५ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या चोरल्या. तसेच नागेश मदारी कलाल (रा. निगडी खुर्द) यांच्या आशीर्वाद ढाब्याचा पत्रा उचकटून त्यातील किराणामाल, स्वयंपाकाची भांडी व बापूसाहेब दादासाहेब सावंत यांच्या दुकानाचा पत्रा उचकटून त्यातील ब्रेकर मशीन, टेपरेकॉर्डर, आदी साहित्य चोरून नेले होते.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व पोलीस कर्मचारी सतीश माने, अभिजित बुधावले, रोहित कोळी यांनी तपास करून, दोघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. रोख रक्कम व सोने अद्याप हस्तगत केले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत.