लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीमार्फत दोन हजार पिशव्या रक्त संकलनाचा संकल्प पूर्ण करण्यात आला.
या संकल्पपूर्तीसाठी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष भूपाल गिरमल, सचिव एन. जे. पाटील, डॉ. रावसाहेब कुन्नूरे, सुभाष मगदूम तसेच तालुका समिती, शाखा संघनायक, उपसंघनायकासह सर्व सदस्यांनी अल्पावधीतच दोन हजार पिशव्या रक्तसंकलन पूर्ण केले. याकरिता जितेंद्र पत्की व वैभव चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबिरावेळी संस्थेचे अध्यक्ष राजोबा म्हणाले की, शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवा, सहाय्य, सहकार्य करण्याची परंपरा निरंतर राखण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून संस्थेमार्फत विविध शाखांच्यावतीने रक्तसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. केलेले रक्तदान एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णांप्रती करूणा, वात्सल्य, प्रेम, जीवदया यांचे दर्शन घडणार असून समाजासमोर आदर्श वस्तूपाठ उभा राहणार आहे.
शिबिरामध्ये नांद्रे, कसबे डिग्रज, टाकळी, ब्रम्हनाळ, वाळवा, सांगली, शिरटी, कुंभोज, कुरुंदवाड, जयसिंगपूर यासह सुमारे सत्तावीस शाखांच्या माध्यमातून दोन हजार पिशव्या रक्तसंकलन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती एन. जे. पाटील यांनी दिली.