सांगली : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (रविवार) तासगावमध्ये सभा होणार असल्याने, या पार्श्वभूमीवर सुमारे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस तासगावमध्ये तळ ठोकून आहेत. जलदकृती दल व घातपातविरोधी पथके दाखल झाली आहेत.लोकसभा निवडणुकीवेळी मोंदींची सांगलीत सभा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा सभा होत असल्याने पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज (शनिवार) सकाळी बंदोबस्ताचा आढावा घेतला. सकाळपासूनच सांगलीतून तासगावला पोलीस बंदोबस्त रवाना केला जात होता. पोलीस ठाण्यात तीन ते चारच कर्मचारी होते. कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पोलिसांनाही बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. सभेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सभास्थळ व परिसराची कडक तपासणी करण्यात आली. यासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली.सभास्थळी उभा करण्यात आलेल्या व्यासपीठाचीही तपासणी केली आहे. व्यासपीठाचा केंद्रीय सुरक्षा पथकाने ताबा घेतला आहे. मोदींच्या संरक्षणासाठी केंद्राचे विशेष पथक येणार आहे. मोदींचा दुपारी १२ ते १२.५५ असा दौरा आहे. दौऱ्याच्या मार्गावरही स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. सायंकाळी जिल्ह्यात नाकाबंदी लावून वाहनांची संशयित वाहनांची तपासणी केली जात होती. (प्रतिनिधी)
दोन हजार पोलीस तैनात
By admin | Published: October 04, 2014 11:42 PM