लोकमत न्यूज नेटवर्क
संख : महसूल विभागाच्या पथकाने जत तालुक्यातील सिंगनहळी व जत डोण भागातून अवैद्य वाळू वाहतूक करीत असताना दोन ट्रॅक्टर मंगळवारी जप्त केले. जत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर लावले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यात लाॅकडाऊनचा गैरफायदा घेत अवैध मार्गाने वाळू उपसा सुरु होता. वाळू उपशाने कोट्यवधी रुपयांच्या काळ्या सोन्याची तस्कर सुरु आहे.
वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी यांनी महसूल विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले होते. जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील महसूल पथकाला गस्त घालताना सिंगनहळी कोरडा ओढा पात्रातून वाळू उपसा करताना दादासाहेब नामदेव हिप्परकर यांचा ट्रॅक्टर आढळून आला.
तसेच जत डोण भागातून वाळू वाहतूक करीत असताना सागर माळी यांचे ट्रॅक्टर महसूल पथकांना आढळून आले. दोन्ही वाळूचे ट्रॅक्टर पकडून जत पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत.
शेगाव मंडल अधिकारी भारत काळे, तलाठी निखिल पाटील, दुशांत पाटील, रवींद्र वालकोली व कोतवाल सुभाष कोळी यांचे पथकाने ही कारवाई केली.
ट्रॅक्टर मालकावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे. वाळू तस्करी विरोधात कडक मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.