सांगली , दि. २८ : येथील आमराईजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन मोटारींची काच फोडून चोरट्यांनी सात हजाराची रोकड, पॅनकार्ड व लॅपटॉप लंपास केला. शुक्रवारी भरदिवसा दोन वाजता ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.
सांगलीतील एक कुटुंब मोटारीने आमराईत जेवण करण्यासाठी आले होते. छत्रपती शिवाजी स्टेडियमजवळ रस्त्याकडेला पार्किंगमध्ये त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी त्यांच्या मोटारीची काच फोडली.
पाठीमागील सीटवर एक पर्स होती. या पर्समधील सात हजाराची रोकड, एटीएम कार्ड लंपास केले. या मोटारीसमोर तासगावमधील एका व्यापाऱ्याने मोटार उभी केली होती. त्या मोटारीची काचही फोडून पाठीमागील सीटवरील लॅपटॉप लंपास केला.
दोन वाजता दोन्ही मोटारींचे मालक आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पण पोलिस तब्बल अर्ध्या तासानंतर आले. रोकड व एटीएम कार्ड लंपास झालेले कुटुंबीय तक्रार द्यायलाच नको, असे सांगून तेथून निघून गेले. तासगावचा व्यापारी तक्रार देणार होता, पण रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही.भीतीचे वातावरणगेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. बसमधील प्रवासी महिलांचे दागिने लंपास केले जात आहेत. बंद घरे फोडली जात आहेत. आता मोटारीची काच फोडून चोरटे ऐवज लंपास करु लागल्याने भीतीचे वातावरण आहे. यातील एकाही घटनेचा पोलिसांना छडा लावता आलेला नाही.