लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाढदिवसानिमित्त दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून आवाज काढण्याच्या स्पर्धा भरविण्याचा प्रकार आयोजकाच्या चांगलाच अंगलट आला. विनापरवाना एकाचवेळी शंभरहून अधिक दुचाकी आणि त्याच्या आवाजाच्या स्पर्धांची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ३७ दुचाकी जप्त केल्या, तर ७१ जण कारवाई सुरू होताच पळून गेले. याप्रकरणी अविनाश कटरे व अनिकेत लोंढे (रा. सांगलीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश कटरे याने सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर स्वत:च्या वाढदिवसानिमित्त गाडीचे सायलेन्सर बदलून अल्टर केलेल्या सायलेन्सरच्या आवाजाच्या स्पर्धा भरविल्या होत्या. दुचाकीस असलेलेे कंपनी फिटेड सायलेन्सर, मोडीफाय, अल्टर केलेले आणि चायनीज सायलेन्सर अशा तीन गटात विजेते निवडले जाणार होते.
या स्पर्धेसाठी एकाच कंपनीच्या १०८ दुचाकींची नाेंदणी झाली होती.
कर्णकर्कश आवाजात या स्पर्धा सुरू असतानाच याची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बागाव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही परवानगी न घेता आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असतानाही या स्पर्धा भरवल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ गाड्या जप्त करण्यास सुरुवात केली. कारवाई सुरू होताच ७१ जणांनी तेथून धूम ठोकली, तर पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेतले. गाड्या जप्त करत पोलिसांनी मंडप मालक, आयोजन समितीसह कटरे व लोंढे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चाैकट
आवाजाची स्पर्धा आयोजकांना नडली
शहरात गेल्या काही दिवसांपासून सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाजात फिरणाऱ्या टोळक्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने या तरुणांचे चांगलेच फावले आहे. यातच कारवाईची भीती नसल्याने थेट आवाजाच्याच स्पर्धा भरविण्यात आल्या आणि सर्वांवर पोलिसांनी कारवाई केली.
--------------------------
फोटो २५ सिटी ०१ एडीटोरीयल