सांगली : शहरातील लक्ष्मी मंदिरजवळ बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या मूर्तीकाराकडील दुचाकीसह सहा लाखांची रोकड लंपास करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. राजअहमद मेहबुब शेख (वय २२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) असे संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यातील अन्य एक संशयित सूरज मोरे अद्यापही पसार आहे.गुरुवार दि. २४ रोजी कुपवाड येथील फिर्यादी अक्षय संपत सूर्यवंशी हे त्यांच्या दुचाकीवरून बॅँकेत पैसे भरणा करण्यासाठी सहा लाखांची रोकड घेऊन जात होते. संशयितांनी त्यांचा पाठलाग करून लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला लाथ मारून ती पाडण्यात आली आणि सहा लाखांची रोकड आणि दुचाकी घेऊन संशयित पसार झाले होते.संजयनगर पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते. रविवारी पोलिसांना माहिती मिळाली की, संशयित शेख हा शिंदे मळा परिसरात असणाऱ्या एका महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत बसला आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिर्यादीची दुचाकी तसेच रोख एक लाख हस्तगत केले.त्याच्याकडे उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता, त्याने त्याचा मित्र दुसरा संशयित सूरज काळे हा बाकीचे पैसे घेऊन निघून गेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू केला आहे. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Sangli: लाथ घालून दुचाकी पाडली, सहा लाखांची रोकड पळवली; संजयनगर पोलिसांनी एकास केले जेरबंद
By शरद जाधव | Published: August 30, 2023 6:05 PM