सांगली : शहरातील शासकीय रुग्णालयातील पार्किंगमधून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी रवींद्र संजय मलमे (रा. इनामधामणी) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. १० जून रोजी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.
----
शासकीय रुग्णालयात दुचाकी चोरीत वाढ
सांगली : शहरातील शासकीय रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. आठवड्यात तीनवेळा असे प्रकार घडले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून घाईगडबडीत पार्क केलेली दुचाकी चोरट्यांचे लक्ष्य बनत आहे. वाहनचोरट्यांचा बंंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
---
ईटीएस मशीनच्या वापराने गतिमानता
सांगली : जमिनीच्या मोजणी, वेगवेगळ्या सर्वेक्षणासाठी करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी ईटीएस मशीन महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल. त्यामुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतिमानता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयास सहा ईटीएस मशीन प्रदान करण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते.
----
शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ
सांगली : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. नवीन शैक्षणिक वर्षासाठी अर्ज सादर करण्यास शुक्रवार दि. १८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.
---
बाल संरक्षण हक्क समितीची बैठक संपन्न
सांगली : बालकांचे हक्क सुरक्षित राहण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या समितीची आढावा बैठक संपन्न झाली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार, उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.