सांगली : कमी दरात सोने देण्याच्या आमिषाने पुणे येथील व्यापाऱ्याला २५ लाखांना लुटणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तुळशीदास सदाशिव नारायणगावकर (वय ४२) आणि साईप्रसाद मोहन पोळ (३१, दोघेही रा. जत्रद वेस, निपाणी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सात लाख रुपयांची रोकड आणि मोटार असा ११ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पुणे येथील व्यापारी मयूर जैन यांचा मित्र असलेल्या सचिन काळभोर यांच्याशी संपर्क साधत मुख्य सूत्रधार अशोक रेड्डी याने कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर जैन यांना सांगलीत बोलाविण्यात आले होते. यावेळी सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे दाखवून त्यांच्याकडील २५ लाखांची रोकड लांबविण्यात आली होती. सातारा पोलिसांनी तातडीने तपास करीत यातील साडे बारा लाख रुपयांची रोकड आणि चार जणांना आनेवाडी टोलनाक्याजवळ अटक केली होती.यानंतर इतर संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना झाले होते. त्यानुसार धामणीजवळ दोघांना जेरबंद करण्यात आले. यावेळी त्यांच्याजवळ सात लाखांची रोकड मिळून आली. त्यांनी अन्य संशयितांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचीही कबुुली दिली.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, सागर लवटे, दीपक गायकवाड, कुबेर खोत, सुनीता शेजाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कमी दरात सोन्याच्या आमिषाने व्यापाऱ्याला लुटणारे दोघे अटकेत, ११ लाखांचा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 4:49 PM