कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथील एका अनाथ मुलीवर दहशत माजविण्याबरोबरच तिला धमकी देऊन जबरदस्तीने डांबून ठेवून परपुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये शैला देवीदास भोरे (वय ४५), सुनीता कुमार खोत (४२, दोघीही रा. कानडवाडी, ता. मिरज) यांचा समावेश आहे.
कानडवाडी येथील शैला भोरे हिने सुनीता खोत हिच्या मध्यस्थीने मिरजेतील एका महिलेकडील अनाथ मुलीला २०१६ मध्ये दीड लाख रुपयाला विकत घेतले. यानंतर तिने पीडित मुलीचा दोन महिने उत्तम सांभाळ केला. त्यानंतर तिने ‘तू घरातील काम करीत नाहीस’ असे म्हणून तिला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली.भोरे ही देवदासी असल्याने ती देवीच्या कार्यक्रमात नाचण्यासाठी पीडित मुलीचा वापर करीत होती. दरम्यान, ती एकदा तिला पलूस येथील देवमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे घेऊन गेली. तेथे तिला देवीची गाणी व नाच करण्यास भाग पाडले. २०१७ मध्ये बुर्ली (ता. पलूस) येथे उरुसासाठी गेल्यानंतर तिने तेथील रोहित नावाच्या मुलाची ओळख करून दिली. त्यानंतर ती रोहितला घेऊन कानडवाडी येथे आली.पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन भोरे हिने तिला रोहितबरोबर जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, तसेच तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच भोरे व खोत या दोघींनी पीडित मुलीस पायाला दोरी बांधून घराच्या छतास उलटे टांगून लोखंडी सळईने बेदम मारहाण केली."बुधवार, दि. १७ जुलै रोजी दुपारी पुन्हा दोघींनी तिला काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. हात-पाय दोरीने बांधून घरात डांबले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून पीडित मुलीने स्वत: सुटका करून मालगाव (ता. मिरज) येथील नातेवाईकांकडे पलायन केले. त्यानंतर तिने कुपवाड पोलिसात संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शैला भोरे व सुनीता खोत या दोघींना अटक केली आहे. पीडित मुलीची रवानगी अनाथाश्रमात करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नीरज उबाळे करीत आहेत.