लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘स्वाइन फ्लू’ने गुरुवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. संगीता अशोक गुरव (वय ३२, रा. हालोंडी, जि. कोल्हापूर) व ललिता तुकाराम कोळी (४२, जुनी-धामणी, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. तसेच नव्याने आणखी दोन संशयित रुग्णही दाखल झाले आहेत.मिरजेतही एका महिलेस स्वाइनची लागण झाली आहे. स्वाइनच्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे सुरू केला आहे.संगीता गुरव यांना मधुमेहाचा विकार होता. आठवड्यापासून त्यांना ताप, खोकला सुरू होता. कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले; पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइनची लागण झाली असेल, असा संशय व्यक्त करून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी १ आॅगस्टला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या थुंकीचे व घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते; पण उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी त्यांच्या तपासणीचा अहवालही प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे म्हटले आहे.ललिता कोळी यांचे पती गेल्या महिन्यात आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना घरी पाठविले. त्यानंतर लगेचच ललिता यांना सर्दी व ताप सुरू झाला. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. खासगी डॉक्टरांनी त्यांच्या थुंकीच्या व घशातील स्रावाच्या केलेल्या तपासणीत त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे म्हटले आहे. उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. डॉक्टरांनी याची माहिती शासकीय रुग्णालयास दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या पथकानेही संगीता कोळी यांच्या थुंकीचे व घशाच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.दरम्यान, शासकीय रुग्णालयात दोन नवे संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये अभयनगर व जमगी (ता. अथणी) येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्याही रक्ताचे व थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
सांगलीत ‘स्वाइन’ने दोन महिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:51 PM