मिरज : मिरजेतील मजती सराफ या दुकानात सेल्समनचे काम करणाऱ्या दोन महिलांनी साडेपाच तोळे दागिने लंपास केले. याबाबत पेढीचे मालक समर्थ सुहास मजती यांनी तीन लाख ३५ हजारांचे साडेपाच तोळे दागिने चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी रूपाली राजेंद्र कोळी व ज्योती महेश जाधव (रा. मिरज) या दोन कर्मचारी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रूपाली कोळी हिच्याकडून साडेपाच तोळे दागिने हस्तगत करण्यात आले.मजती सराफ पेढीत सुमारे वीस कर्मचारी असून यापैकी पंधरा महिला आहेत. सराफी दुकानात दहा वर्षे काम करणारी विश्वासू महिला कर्मचारी रूपाली कोळी ही काउंटरवर दागिने विकल्याची चिठ्ठी करून देऊन हे दागिने पर्समध्ये घालत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले. तिच्या पर्सची झडती घेतल्यानंतर एक २२ ग्रॅमची सोन्याची चेन सापडली. या महिला कामगारास पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी तिला ज्योती जाधव या कर्मचारी महिलेने चिठ्ठी बनवण्यास व चोरीचे दागिने विक्री करण्यास मदत केल्याने तिच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कर्मचारी महिलांनी सुमारे २५ तोळे दागिने चोरल्याचा संशय आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सोनकांबळे तपास करत आहेत.