मिरज : बेडग (ता. मिरज) येथे मंगसुळी रस्ता परिसरात म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात माधवनगर (ता. मिरज) येथील तिघे तरुण वाहून गेले. यातील एका तरुणाला वाचविण्यात यश आले. मात्र, वाहून गेलेल्या इतर दोघांचा दिवसभर कालव्याच्या पाण्यात शोध सुरू होता.सलमान शौकत तांबोळी (वय २१) व आरमान हुसेन मुलाणी (१६, दाेघेही रा. माधवनगर, ता. मिरज) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. नदीम फिरोज मुलाणी (१८, रा. माधवनगर) यास पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.छताला प्लास्टरचे काम करणारे माधवनगर येथील सलमान तांबोळी, आरमान मुलाणी, नदीम मुलाणी व कुलदीप मौर्य हे चाैघे जण एका टेम्पाेतून मंगळवारी दुपारी पीओपीचे काम करण्यासाठी बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील शिंदे वस्ती परिसरात आले हाेते. कामाच्या ठिकाणी साहित्य उतरवल्यानंतर ते जवळच असलेल्या म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्याजवळ आले. सध्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू असल्याने मुख्य कालवा तुडुंब भरून वाहत आहे.पाणी पाहून सलमान व आरमान टेम्पाेतून उतरून कालव्याकडे हात-पाय धुण्यासाठी गेले तर नदीम व कुलदीप हे टेम्पाेजवळ थांबले. हात-पाय धूत असताना अचानक ताेल गेल्याने सलमान कालव्यात पडला. यावेळी त्याचा धक्का लागल्याने अरमानही पाण्यात पडला. हे पाहून त्यांना वाचविण्यासाठी नदीमने पाण्यात उडी घेतली, त्याने सलमानचा हात पकडला; परंतु पाण्याची गती जास्त असल्याने याला सलमानला वाचवणे शक्य झाले नाही. तोही वाहून जात असल्याचे पाहून टेम्पाेजवळ थांबलेल्या कुलदीपने पळत जाऊन नदीमला पाण्याबाहेर ओढले.मात्र सलमान व आरमान हे दोघेही वाहून गेले. तत्काळ मिरज ग्रामीण पाेलिसांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनी आयुष्य हेल्पलाइन पथकाच्या मदतीने कालव्यात दिवसभर शोध माेहीम राबविली. पाण्यातून बाहेर काढलेल्या नदीम मुलाणी याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिरज ग्रामीण पोलिस व आयुष्य हेल्पलाइनच्या पथकाकडून तिसऱ्या टप्प्यात कालव्याला जाळी लावून तरुणांना शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. यावेळी कालव्याच्या काठावर मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
Sangli- बेडगला म्हैसाळ याेजनेच्या कालव्यात दोघे तरुण बुडाले, एकजण बचावला; दोघांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 12:49 PM