पलूस : काश्मीरमधील अनंतनाग येथील लाल चौकात मंगळवारी १८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या गोळीबारात राजेवाडी (ता. आटपाडी) येथील अक्षय कांता पाटोळे (वय २०) हा जखमी झाला. तर त्याचा सहकारी सौरभ प्रदीप नलवडे (वय २०, दुधोंडी, ता. पलूस) हा धावपळीत किरकोळ जखमी झाला आहे. दोघेही तेथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.सौरभ आणि अक्षय हे दोघे गलाईचे काम करतात. दोन वर्षांपासून ते काश्मीर येथील अनंतनाग येथे कामानिमित्त राहतात. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दोघे जण व्यायामासाठी लाल चौकातून जिमकडे जात होते. त्यांच्याबरोबर एक स्थानिक रहिवासीही होता. त्याचवेळी त्यांच्यावर अज्ञाताने अचानक अंदाधुंद गोळीबार केला. अक्षय याच्या दंडाला गोळी घासून गेली. गोळीबाराच्या आवाजाने पळापळ झाली. त्यामध्ये सौरभही जखमी झाला. गोळीबारानंतर सौरभने अक्षयला रुग्णालयात नेले.जखमी अक्षयची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्यात सांगली जिल्ह्यातील दोघे जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दुधोंडी आणि राजेवाडी परिसरातील नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु दोघेही आता व्यवस्थित असल्याचे समजल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सौरभ दोन वर्षांपासून काश्मिरातबारावी शिकलेल्या सौरभची घरची परिस्थिती गरिबीची आहे. काश्मीर येथे गलाई व्यवसाय करणाऱ्या मामा महेश बाबुराव यादव (मूळ रा. देवराष्ट्रे ता. कडेगाव) यांच्याकडे तो दोन वर्षांपासून काम करतो. अक्षयच्या घरची परिस्थितीही बेताचीच आहे. दिघंची येथील मामा संतोष बुधावले यांच्या अनंतनाग (काश्मीर) येथील दुकानात कामास आहे.