सांगली : शहरातील आयर्विन पुलावर शुक्रवारी किटकांच्या थव्यांमुळे दोन दुचाकींचा अपघात होऊन दोन तरुण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून या पुलावर किटकांमुळे अपघात वाढल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.शेमटी (मे फ्लाय) या किटकांच्या झुंडीच्या झुंडी सध्या आयर्विन पुलावरील विद्युत दिव्यांभोवती फिरत आहेत.दररोज रात्री या किटकांचे साम्राज्य संपूर्ण पुलावर पसरलेले असते. शुक्रवारीही या किटकांनी पूल व्यापला असताना त्याला चुकविण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची धडक झाली. यात दोन तरुण जखमी झाले. मृत किटकांचे थर रस्त्यावर पडल्याने त्यावरुन वाहने घसरत आहेत. त्यामुळे पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहनधारक या किटकांमुळे त्रस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी अंकली (ता. मिरज) येथेही या किटकांमुळे मोठे अपघात घडले होते.मेफ्लाय हे या किटकाचे शास्त्रीय नाव असले तरी त्याला मराठीत शेमटी असे म्हटले जाते. नदी, नाले, तलाव अशा पाण्यावर वाढणारे व जन्म घेणारे हे जलीय किटक असतात. एकावेळी मोठ्या संख्येने म्हणजेच लाखोंच्या संख्येने यांच्या झुंडी बाहेर पडतात.काय आहेत वैशिष्ट्येमेफ्लाय यांच्या जगभरात जवळपास अडिच हजार प्रजाती आहेत. त्यांची लांबी ३ ते ३0 मिलिमीटरपर्यंत असते. एफिमेरोप्टेरा गणातील मऊ अंगाचे हे कीटक आहेत. तळी, सरोवरे, नाले, नदया यांच्या काठांवर सायंकाळी सूर्यास्तानंतर ते थव्याथव्याने दिसतात.
ते दिव्याकडे आकर्षिले जातात. त्यांचे आयुष्य फक्त सहा ते सात तासांचे असते. या कीटकांची अंडी व डिंभकावस्था पाण्यात पूर्ण होतात. डिंभक माशांचे उपयुक्त अन्न असल्यामुळे हे कीटक उपयोगी असतात. प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने हे किटक जन्म घेतात. त्यांची अंडी पाण्यात असतात.