मिरज : अमावास्येच्या रात्री मिरजेत कोल्हापूर रस्त्यावर अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आला. रस्त्याकडेला उतारा टाकणारे दोघेजण सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहेत. दोघांनी रस्त्याकडेला नारळ, उतारा ठेवला. रस्त्यावरून जाताना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना हा प्रकार दिसला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा असतानाही अजून अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक जादूटोण्याचे असे प्रकार करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी थोरात यांनी केली.दरम्यान, या दिवशी जादुटोणे किंवा मंत्रतंत्राचे प्रकार सर्रास चालत असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तीन रस्त्यांवर अंडी किंवा नैवेद्य ठेवणे, नारळ आणि गुलाल टाकणे असेही प्रकार काहींना आढळले. मिरजेत विधानसभा निवडणुकीचा संघर्ष आतापासूनच सुरु झाला आहे. गुडघ्याला आमदारकीचे बाशिंग बांधून मंडपात येण्यास तयार झालेल्या नेत्यांमध्ये विरोधकाला नामोहरम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच जादुटोण्याचे प्रकार सुरु असल्याचा अंदाज आहे. याप्रकाराबाबत पोलिसांत मात्र कोणीही तक्रार दिलेली नाही.
मिरजेत अमावास्येच्या रात्री अंधश्रद्धेचा प्रकार, घटना सीसीटीव्हीत कैद
By संतोष भिसे | Published: December 14, 2023 6:16 PM