लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र म्हणून जादूटोणा करत असल्याच्या आरोपावरून आटपाडीतील संजय दादा गेळे व अश्विनी संजय गेळे (रा.बायपास रोड आटपाडी) यांच्यावर अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी (दि.१९) आटपाडी येथील निंबवडे येथील वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाचे नातेवाईक असल्याचे खोटी माहिती देऊन विनापरवाना प्रवेश केला. यावेळी रुग्ण सोनाली शिवदास जिरे हिच्या कपाळावरून बोटे फिरवत टॅब मधील मजकूर वाचून शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवून जादूटोणा व भोंदूगिरी केले असल्याचे सीसीटीव्हीमध्ये व्हिडीओ चित्रीकरण झाले आहे. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी तालुक्यामध्ये खळबळ माजली असून याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत होता. याबाबत प्रसारमाध्यमातून आवाज उठवल्यानंतर अखेर आज, शुक्रवारी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत. गृह विभागाकडून आटपाडी मध्ये सुरू असणाऱ्या धर्मातरण प्रकरणामध्ये सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित व्यक्तीचे कारनामे लवकरच उघडकीस येणार आहेत.
रुग्णालयात जादूटोणाचा प्रकार: ..अखेर सांगलीतील आटपाडी येथील गेळे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:13 PM