Sangli: काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत कुरकुर करू नये, अन्यथा...; चंद्रहार पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:37 PM2024-06-17T17:37:23+5:302024-06-17T17:40:19+5:30
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना माफ केले.
विटा : आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील आठपैकी दोन मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने कुरकूर करू नये. त्यांनी गद्दारीचा विचार सोडून द्यावा, अन्यथा, त्यांना महाराष्ट्रभर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा उद्धवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी रविवारी दिला.
विटा येथे ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघासह अन्य एक किंवा दोन ठिकाणी राष्ट्रवादी लढेल, असे जाहीर केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनीही जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार असतील, असे म्हटले आहे. त्यांची खिल्ली चंद्रहार पाटील यांनी उडविली.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात १२-१५ आमदार करायचे असतील तर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सध्या फक्त आठ मतदारसंघ आहेत आणि तेथे दोन-दोन उमेदवार विजयी करता येणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हिशोबात बोलावे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपातील चर्चेतून सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला होता. मी उमेदवारी केली होती. महाविकास आघाडी म्हणून नेत्यांनी धर्मपालन करणे गरजेचे होते. तेथे गद्दारी केली. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार विजयी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना माफ केले.
मात्र आता विधानसभेसाठी ज्याने-त्याने उठून आकडे मांडू नयेत. राज्यात २०१९ ला काँग्रेसचा एक खासदार होता. आता १३ खासदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे ४ खासदार होते. आता आठ झाले आहेत. यामागे उद्धव ठाकरे यांचे श्रमदेखील महत्त्वाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत या यशाची पुनरावृत्ती करायची असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी भानावर येऊन संयम ठेवून बोलावे.
शिवसेना ठाकरे गट खानापूर आणि मिरज मतदारसंघातून लढणार आहे. दोन्ही ठिकाणी पक्षाची उत्तम बांधणी आहे. २०१४ आणि २०१९ला खानापूर शिवसेनेने जिंकले आहे. मिरज हा शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांची ताकद आणि प्रभाव आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांवर दावा सांगून कुणी गडबड करू नये, अन्यथा राज्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा चंद्रहार पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.