सांगली : आमचेच सामान नेऊन होळी पेटवायची अन् आमच्याच नावाने पुन्हा शिमगा करायचा, अशी भाजपची वृत्ती आहे. अशा नतद्रष्ट राजवटीची होळी यंदा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने करावी, असे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात केले.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिरजेतील शासकीय रुग्णालयासमोरील मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, तेजस ठाकरे, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी जे बीजारोपण केले त्यातून आजही अंकुर फुटताहेत. भाजपचे बियाणे बोगस आहे. त्यांना अंकुर फुटत नाहीत म्हणून बाहेरून माणसे घ्यावी लागतात. भाजपला भस्म्या रोग झाला आहे. कितीही माणसे पळविली तरी त्यांची भूक शमत नाही.औरंगजेब जसा धर्माचे ढोंग करीत होता तसेच ढोंग गुजरातचे दोन नेते करतात. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. लोकांची घरे जाळण्याचे त्यांचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटविणारे आहे. आम्ही द्वेषाचे राजकारण कधी केले नाही. शिवरायांनी सुरत लुटली होती. आता त्याच गुजरातमधील दोन नेते संपूर्ण महाराष्ट्र लुटताहेत, ओरबाडताहेत. महाराष्ट्रातील जनता अशा लुटारूंना व औरंगजेबी वृत्तीला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही.
ते म्हणाले, दोन पक्ष फोडल्याची फुशारकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत मारली. दुसऱ्याच्या संपत्तीवर दरोडा टाकून त्यावर नागोबासारखे वेटोळे घालून ते बसलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी घाणेरडी परंपरा कधी नव्हती. शरद पवार व वसंतदादा पाटील विरोधी पक्षात असतानाही बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. मतभेद असूनही एकमेकांना संपविण्याचे राजकारण कधी कुणी केले नाही. आता माणसांना, घटनेला, लोकशाहीला संपविण्याचे सुडाचे राजकारण सुरू आहे.संजय राऊत म्हणाले, ज्या भाजपने गोमाता रक्षणाची मोहीम राबविली. अनेक निरपराध लोकांना गोमांसावरून मारण्याचे पाप केले त्याच भाजपच्या खात्यावर गोमांसची निर्यात करणाऱ्या एका कंपनीने २५० कोटी रुपये भरले. असे ढोंगी हिंदुत्व भाजपने जपले आहे. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केले.
शीरच्छेद कधीच करणार नाही
ठाकरे म्हणाले, औरंगजेब वृत्तीला मूठमाती देण्याचे आवाहन मी जनतेला केल्यानंतर नरेंद्र मोदींनी लगेच गैरसमज पसरविला. त्यांच्या शीरच्छेदाची योजना मी आखल्याचे ते सांगू लागलेत. माझ्यावर असे संस्कार नाहीत. मी कधीच कोणाचा शीरच्छेद करणार नाही, पण वाईट वृत्तीला महाराष्ट्राच्या मातीत मूठमाती देणार.
कुंडल्या घ्या, झाडाखाली बसामुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांच्या कुंडल्या बाळगल्याचे सांगत आहेत. माझा तर त्यांना सल्ला आहे की, त्यांनी कुंडल्या घेऊन एखाद्या झाडाखाली बसून कुडमुड्या ज्योतिषी म्हणून व्यावसाय सुरू करावा, अशी टीका ठाकरे यांनी केली.
कोल्हापुरात महाराजांच्या पाठीशी
मागच्या वेळी शिवसेनेचा उमेदवार कोल्हापुरात जिंकला होता तरीही आम्ही यावेळी काँग्रेसला जागा दिली. छत्रपती शाहू महाराज यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. काहीही झाले तरी कोल्हापुरात महाराजांच्या पाठीशी आम्ही राहणार, असे ठाकरे म्हणाले.
धनुष्यबाणाखालीही अट हवीन्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाखाली जशी अट लिहिण्याचे आदेश न्यायालयाने दिले तसेच धनुष्यबाणाच्या खालीही लिहिण्याचे आदेश व्हायला हवेत, असे ठाकरे म्हणाले.
पुत्रप्रेमामुळे गुजरातमध्ये भारत हरलाठाकरे म्हणाले, आमच्यावर ते घराणेशाहीचा आरोप करतात. बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या सात पिढ्यांचा इतिहास मी सांगू शकतो. मोदी व शहांनी त्यांच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगून दाखवावा. एकाच घरात खासदार, आमदार असणाऱ्या अनेकांना यांनी भाजपमध्ये घेतले तेव्हा घराणेशाही त्यांना आठवली नाही. ज्यांना क्रिकेट कळत नाही त्या जय शहांना क्रिकेट बोर्डावर घेताना घराणेशाही नव्हती का? अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळेच विश्वचषकाचा अंतिम सामना गुजरातला नेला. याच पुत्रप्रेमाने भारत हरला.