सांगली : उद्धवसेनेला सांगली लोकसभेची जागा गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप टोकाला गेला असून, शुक्रवारी मिरज तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. संतापाच्या भरात पक्षाच्या जिल्हा कार्यालयावरील काँग्रेसचे नाव पुसून टाकण्यात आले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी चार उमेदवारी अर्ज आणले आहेत.
विशाल पाटील यांनी निवडणूक मैदानात उतरावे, असे आवाहन करत पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनसमोर गर्दी केली. महाविकास आघाडीने सांगलीत काँग्रेसला उमेदवारी दिली नसल्याचे तीव्र पडसाद उमटले. जत पॅटर्ननुसार काँग्रेस पक्ष बरखास्त करण्याबाबतची चर्चा दोन दिवस रंगली असतानाच मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली.आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते सांगलीतील काँग्रेस भवनसमोर जमले. त्यांची बैठक झाली. त्यात जिल्हा काँग्रेसवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. वसंतदादा घराण्याची कोंडी केली जात आहे, असा आरोप करत आता बंद दार फोडून आत जाण्याची वेळ आली आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या लढाईसाठी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करत असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी केले.यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार, सुभाष खोत, सुनील आवटी, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील, सदाशिव खाडे, विशाल चौगुले, गणेश देसाई, सावन दरुरे आदी उपस्थित होते.
काँग्रेसची आज बैठककार्यकर्त्यांच्या मागणीनुसार, विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी चार उमेदवारी अर्ज घेत निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी किंवा मंगळवारी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सांगलीत शनिवार, १३ एप्रिल रोजी नियोजनाची बैठक होईल, असे सांगण्यात आले.
‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासलामिरज तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नामफलकावरील ‘काँग्रेस’ या शब्दाला पांढरा रंग फासला. काँग्रेस पक्षावर आमचे प्रेम आहे. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसने हक्काचा मतदारसंघ गमावला : अण्णासाहेब कोरेकाँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी डावलून एक हक्काचा मतदारसंघ गमावला आहे. येथे विजयाची संधी असताना घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. अशावेळी काँग्रेसमध्ये राहून आम्ही लढू शकत नाही. त्यासाठी कमिटी बरखास्त केली आहे. विशाल पाटील यांनी बंद दारावर लाथ मारावी. मदन पाटील यांच्याप्रमाणे जिगरबाज लढत द्यावी, अशी आमची मागणी आहे. ते लढणार आणि जिंकणार याचा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी दिली.