कडेगाव : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना व संभाव्य महाशिवआघाडीचे संकेत मिळत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. खचून जाऊ नका, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत, शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहोत, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.नेवरी (ता. कडेगाव) येथे शुक्रवारी उध्दव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे सूतोवाच केले. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते उपस्थित होते. नेवरी येथील शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या.यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईबाबत विचारले असता, खचून जाऊ नका, घाबरू नका, मी आपल्याला धीर द्यायलाच आलोय, दिलासा द्यायला आलोय, आपण शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहोत. मोठी नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे मदत करावीच लागेल, असे ठाकरे म्हणाले.अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्याप कित्येक शेतकºयांचे शेतीपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. सरकारकडून काहीच मदत मिळालेली नाही. कोणी पाहणी करायलाही आले नाही. पिकाला भाव नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.
यावर आमदार विश्वजित कदम म्हणाले की, प्रशासनाने चांगले काम केले, परंतु उर्वरित शेतकºयांचे पंचनामे तातडीने करणे गरजेचे आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करा, अशा सूचना ठाकरे यांनी तहसीलदार शैलजा पाटील यांना दिल्या.