सांगली - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवरील गुपित बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूरातून आपल्या महाराष्ट्र दौ-याला सुरुवात करणा-या नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. उद्धव यांनी माझ्यावर आरोप करु नयेत अन्यथा मातोश्रीवरील सर्व गुपितं बाहेर काढेन असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांना मी कुठलंही दु:ख दिल नाही उलट मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनीच बाळासाहेबांना त्रास दिला असा आरोप त्यांनी केला. 2017मध्येच मी मंत्री होईन असा दावा राणेंनी केला. गुजरातमध्ये काहीही झालं तरी मला भाजपाकडून मंत्रिपद दिल जाईल असे राणे म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले.
खरतर नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. नारायण राणे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले जाईल अशी चर्चा होती. पण शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंना ना आमदारकी मिळाली ना मंत्रिपद त्यामुळे राणेंनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती. ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे त्यामुळे राज्यातून अनेक जण माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे नारायण राणे शुक्रवारी म्हणाले होते.
उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का?, उध्दव ठाकरे यांना कोणत्याही खात्याची माहिती नाही. उध्दव ठाकरे यांना सरकारचे पटत नसेल तर घटस्फोट का घेत नाही ? सरकार बरोबर नाक घासत तीन वर्षे काढली नाना पटोलेकडून काहीतरी घ्यावे असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला.