प्रताप महाडिक ।कडेगाव : राज्य सरकारला ताकारी, टेंभू योजना सुरू करण्याबाबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनात दिलेल्या ८ दिवसांच्या अल्टिमेटम्ची मुदत २१ डिसेंबररोजी संपली. शासनाने टंचाई उपाययोजना निधीचे पैसे अद्याप दिले नाहीत. त्यामुळे दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू झाले नाही. त्यामुळे आता आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ताकारी व टेंभू योजनांच्या आवर्तनासाठी कडेगाव तहसीलवर मोर्चा काढला होता. आठ दिवसात आवर्तन सुरू झाले नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला होता. जितेश कदम यांनी, कडेगाव तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता, तर आंदोलक शेतकºयांनी योजनांच्या लाभक्षेत्रात कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करणार, असे सांगितले होते. आता आठ दिवसांची मुदत संपली. त्यामुळे विश्वजित कदम काय निर्णय घेणार, यावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
ताकारी योजनेची १० कोटी ३० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे महावितरणने दोन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. लाभक्षेत्रातील बहुतांशी शेतीपिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र पाणीपट्टीचे पैसे चोख भरूनही हतबल झाले आहेत.
ताकारी योजनेची जवळपास १ कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २ कोटी ५० लाख इतकी पाणीपट्टी साखर कारखान्यांकडून येणे बाकी आहे. याशिवाय टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची ताकारी योजनेची ४ कोटी, तर टेंभू योजनेची ८ कोटी इतकी रक्कम राज्य शासनाकडून येणे बाकी आहे. योजना सुरु झाल्यापासून आजवर ताकारी योजनेची जवळपास ४६ कोटी ६३ लाख, तर टेंभू योजनेची ३५ कोटी ६९ लाख इतकी पाणीपट्टी थकबाकी शेतकºयांकडून येणे बाकी आहे. सध्या ताकारी योजनेची साडेदहा कोटी व टेंभू योजनेची साडे एकवीस कोटी वीज बिल थकबाकी आहे.
दोन्ही योजनांची किमान ५० टक्के वीजबिल थकबाकीची रक्कम भरुन उर्वरित ५० टक्के भरण्याची हमी संबंधित योजनांकडून मिळाल्याशिवाय या योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत न जोडण्याचा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे आवर्तनाच्या आशा धुसर झाल्या आहेत .
आता राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसवू : कदमनिष्क्रिय शासनाने टंचाई निधी दिला नाही. त्यामुळे आवर्तन सुरू झाले नाही. आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आवर्तनासाठीच्या लढ्याला बळ देऊन राज्यकर्त्यांच्या उरात धडकी बसविल्याशिवाय आवर्तनाचा मार्ग मोकळा होणार नाही. आता आंदोलन तीव्र करणार, असा इशारा जितेश कदम यांनी दिला आहे.