सांगली : रेल्वेत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांविरोधात रेल्वे पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंडाच्या कारवाया केल्या आहेत. पाण्याच्या १९ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.विभागीय व्यवस्थापक इन्दू दुबे, अतिरिक्त व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात आल्या. २७ एप्रिल २०२४ पासून सुरु केलेल्या या मोहिमेत पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर आदी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्ये कारवाया झाल्या. अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांच्या आरोग्याला धोकादायक अन्नपदार्थ विकले जात असल्याचे तपासणीदरम्यान आढळले. शिजवलेले अन्न, अनधिकृत ब्रँडचे पॅकिंग केलेले पिण्याचे पाणी, अस्वच्छ परिस्थितीत पॅक केलेले स्नॅक्स, तसेच गाडीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर चहा, कॉफीची विक्री होत असल्याचे आढळले.मोहिमेत ५६० अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. त्यापैकी ३५१ विक्रेत्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून ३ लाख १७ हजार ४२५ रुपये दंडाची वसुली करण्यात आली. विविध केटरिंग स्टॉल्सची अचानक तपासणी केली असता अनेक दोष आढळले. या परवानाधारकांना दंड ठोठावण्यात आला. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी गैरवर्तन करु नये अशा सूचना देण्यात आल्या.प्लॅटफार्मवरील विविध अधिकृत स्टॉलमधून नऊ खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून दोष आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.पाण्याच्या १९ हजार बाटल्या जप्तरेल्वेतर्फे प्रवाशांना सवलतीच्या दरात रेल नीर ब्रॅण्डखाली पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. पण सर्रास रेल्वे गाड्यांमध्ये १५ रुपयांच्या रेल नीरऐवजी खासगी कंपन्यांच्या बाटल्या २० रुपयांना विकल्या जातात. प्रशासनाने विनापरवाना पॅकिंग केलेल्या १ हजार ९४५ बाटल्या जप्त केल्या. पाणीविक्री आणि खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे घेणे यासाठी ६० हजार रुपये दंड वसुल केला.
प्रवाशांनी तक्रारी कराव्यातप्रशासनाने आवाहन केले की, रेल्वे स्थानक परिसरातील अधिकृत स्टॉल्स किंवा विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घ्यावेत. अनधिकृत विक्रेते किंवा गैरप्रकार आढळल्यास सोशल मीडिया, रेल मदद तक्रार पुस्तिका अथवा कोणत्याही संपर्काच्या माध्यमातून तक्रार करावी.