सांगली : महापालिकेच्या निष्क्रिय प्रशासनावर बुधवारी महापौर गीता सुतार यांनी संताप व्यक्त करीत अधिकाऱ्यांना झापले. शहरात पाणी येत नाही, पथदिवे बंद आहेत, नगरसेवक, आयुक्तांचेही आदेश अधिकारी मानत नाहीत. किमान जनतेच्या पैशातून आपण पगार घेतो, याचे तरी भान ठेवा. आम्ही खुर्च्या खाली करतो, तुम्हीच निवडणूक लढवा, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
महापालिकेची ऑनलाईन सभा महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेच्या सुरुवातीपासून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा, दिवाबत्ती साहित्य खरेदी व अन्य विषयांवर अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले. त्यातच काही अधिकाऱ्यांकडे विचारलेल्या प्रश्नांची माहितीच नव्हती. ते मोघम उत्तरे देऊ लागल्याने महापौर सुतार चांगल्याच भडकल्या. महासभेत महापौर ठराव करतात, आदेश देतात, त्यांचीही किंमत अधिकारी ठेवत नाहीत. महापौरांनी आदेश द्यायचे, नगरसेवकांचे ऐकायचे आणि घरी जायचे, हेच काम आहे. महापौरांना काही किंमत आहे की नाही? पार्टी मिटिंगलाही अधिकारी येत नाहीत. आम्ही घरी बसतो, अधिकाऱ्यांनीच निवडणूक लढवावी आणि नागरिकांच्या सामोरे जावे. गटारी, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट यासारखे साधे प्रश्नही जर सुटत नसतील, तर एक दिवस जनताच महापालिका बरखास्त करेल. अधिकारी थेट लोकांकडून पैसे मागतात. याबाबत नगरसेवकांकडून पुराव्यानिशी तक्रारी होत आहेत. जनतेच्या पैशातून तुमचा पगार होतो, त्यावर घर चालते, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दात महापौर सुतार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. अधिकाऱ्यांवर राग व्यक्त करताना आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कामाचे मात्र त्यांनी कौतुक केले. खुद्द आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली.
चौकट
बांधकाम परवानगीसाठी दोन लाख रुपये
महापौर गीता सुतार यांनी, लोकांकडून पैसे घेऊन अधिकारी काम करत असल्याचा गंभीर आरोपही केला. एका अधिकाऱ्याने दोन लाख रुपये मागितल्याचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी पार्टी मिटिंगमध्ये पुराव्यानिशी सांगिल्याचे महापौरांनी भर सभेत उघड केले. यावर त्यांनी सूर्यवंशी यांची साक्षही काढली. सूर्यवंशी यांनीही त्याला पुष्टी दिली. आयुक्तांनीही, हे प्रकरण जुने असून या तक्रारीची आपण दखल घेण्याचेही स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला.