अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात भुयारी गटारींचे काम ठप्प झाले आहे. काही ठिकाणी उघड्या गटारी धोकादायक बनल्या असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. शिवाय निधी असतानाही भुयारी गटारींमुळे रस्त्यांच्या कामाला स्थगिती आली आहे. सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीच्या श्रेयवादात ही कामे थांबली आहेत.
भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर शहरातील भुयारी गटारी योजनेला हिरवा कंदील दाखविला होता. परंतु चार वर्षांहून अधिक काळ लोटला तरी हे काम पूर्ण झालेले नाही. सध्या पावसामुळे काम पूर्णपणे थांबले आहे. काही प्रभागात आणि मुख्य रस्त्यावर गटारीचे काम झाले आहे. तेथील रस्त्यांचे काम अर्ध्यावरच असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यातून आलेल्या निधीतून उघड्या गटारींची कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. सध्या आझाद चौक ते जयहिंद टॉकीज दरम्यानच्या गटारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे हा रस्ता दलदलीचा बनला आहे.
आझाद चौक, मोमीन मोहल्ला, शिराळा नाका ते प्रशासकीय इमारतीच्या दरम्यान रस्त्याचे काम अर्ध्यावरच सोडले आहे. तेथील उपनगरातील रस्त्यांची कामे घोषणाबाजीत विरली आहेत.
कोट
पावसाळा संपल्यानंतर सर्वच रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्याची तयारी विकास आघाडीने केली आहे. शहरातील गटारींची कामे पूर्ण होतीलच.
- विक्रम पाटील, गटनेते, विकास आघाडी
कोट
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शहरासाठी निधी आणला आहे. मात्र सत्ताधारी विकास आघाडीस विकासाचे नियोजन करता आले नाही. सध्या जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या निधीतून गटारी आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत.
- शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी