पलूस : बाबासाहेबांना समजून घेतल्याशिवाय देशातील अर्थकारण राजकारण, समाजकारण समजणार नसल्याची भावना संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. ज. रा. दाभोळे यांनी व्यक्त केली. पलूस येथे रविवारी श्री समर्थ साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चौदाव्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी डॉ. बाबूराव गुरव, व्ही. वाय. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी स्वागत केले. व्ही. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दाभोळे म्हणाले की, बाबासाहेबांनी केलेली जातीअंताची भाषा समाजाने करायला हवी. जग बदलण्याचा प्रारंभ माझ्यापासून झाला पाहिजे. देव, देऊळ, ईश्वर मानवनिर्मित असून, त्यापेक्षा पाथरवटाची पूजा केलेली बरी. मध्यस्थ आणि दलाल आम्हाला नाकारायचा आहे. आजच्या काळात माणूस म्हणून जगणं कठीण झालं असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. सध्या विचारवंत, पत्रकारांवर हल्ले, धमकीसत्र सुरु असून, ते गंभीर असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. हे बदल घडविणे म्हणजेच परिवर्तन आहे. देश बदलायचा, तर सद्भावनेची जपणूक करा, कर्मवीरअण्णा म्हणायचे, न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड, तो माझ्या संस्थेचा विद्यार्थी. पण आजची परिस्थिती बघून कुणाला चीडच येत नाही. कोणत्या घरात जन्माला यावे, हे आपल्या हातात नसते. पण आपले कर्तृत्त्व सिद्ध करणे स्वत:च्या हातात असते. प्रथम सत्रात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा. विठ्ठल सदामते, कवयित्री मनीषा पाटील, शाहीर अनिता खरात, फारुख गवंडी, अॅड. दीपक लाड, बाळकृष्ण चोपडे, विक्रमसिंह शिरतोडे, प्रा. डॉ. संगीता पाटील, प्रतीक पाटील, गोमटेश चौगुले यांचा गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बांबवडे येथील ज्येष्ठ लेखिका जानकीताई भोसले यांच्या ‘नका म्हणू लेकी झाल्या’, ‘कळी अशी उमलूदे’ या दोन कथासंग्रहांचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महिला शाहीर अनिता खरात यांचा प्रबोधनपर लोकगीतांचा व पोवाड्याचा कार्यक्रम झाला. मान्यवरांचे व नवोदितांचे कवी संमेलन कवी प्रदीप कांबळे, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यामध्ये कवी नामदेव जाधव, संतोष काळे, ज्ञानेश्वर कोळी, संदीप नाझरे, नंदिनी साळुंखे, वैजयंता पेटकर, आलिशा मोहिते, चंद्रकांत देशमुखे, तानाजी जाधव, सतीश लोखंडे, विशाल शिरतोडे, चंद्रकांत कन्हेरे, ऋषिकेश खारखे, जयवंत आवटे, सुमंत सगरे, रूपाली शिंदे यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष कवी किरण शिंदे, उपाध्यक्ष कुमार गायकवाड, सचिव संजीव तोडकर, प्रा. रवींद्र येवले, व्ही. वाय. पाटील, जयवंत मोहिते, शशिकांत रेपाळ, जितेंद्र कांबळे, शंकर महाडिक, जगन्नाथ सुवासे, रामनाथ चव्हाण, दिलीप वडकर, सुरेखा कोळेकर यांनी केले. (वार्ताहर) आमची भाषा : आमचं शिवार उद्घाटनप्रसंगी प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, ग्रामीण माणसं लहरी आहेत. ही लहर बदलून परिवर्तन घडवायचं आहे. परिवर्तनाच्यादृष्टीने साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. आमची भाषा आमचं शिवार आहे. आमची ग्रामीण भाषा गोफनगोंडा आहे. वैर घेतलं तर टिप्पीरा देते. साहित्यात आत्मा ओतून त्यातून परिवर्तन करणारी माणसं घडवायची आहेत. आज समाजमाध्यमातून लिहिणारी नवी फळी निर्माण होत आहे. शेती, माती, नाती हा संस्कृतीचा पाया आहे. असेही ते म्हणाले.
परिवर्तन घडविण्यासाठी बाबासाहेब समजून घ्या
By admin | Published: August 21, 2016 11:59 PM