लिंगनूर ,दि. 20 :: रामनगर (आरग, ता. मिरज) येथील मातृ-पितृ छत्र हरविलेल्या बहिण-भावंडांसाठी मायेचे आणि माणुसकीचे छत्र आता उभारले जाऊ लागले आहे. या भावंडांच्या व्यथेची कथा आणि शाळेतील मुलांच्या मदतीची अनोखी घटना ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आता समाजातील अन्य सामाजिक संस्था व व्यक्तिंनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
रामनगर (आरग) येथील सूरज चंद्रकांत नाईक व पूजा नाईक या निराधार भावडांसाठी आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. परिसरातील नागरिकांची सूरज व त्याच्या मतिमंद बहिणीला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
निराधार मुलांसाठी काम करणाºया बीड व शिरगुप्पी येथील संस्थेने त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. तसेच मिरज पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, आरग येथील सामाजिक कार्यकर्ते सागर वडगावे, आरग ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव खटावे यांनी या मुलांना व त्यांच्या घरास भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार सुरेश खाडे यांनी देखील या भावंडांना आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
लिंगनूरपासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या रामनगर येथील खोराडी वस्तीवरील ही हृदयाला पाझर फुटेल अशी सत्य घटना. सूरज चंद्रकांत नाईक याचे आई, वडील मूळचे मिरज येथील वीटभट्टी परिसरात राहायला होते. प्रथम त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मुलांची आई मोलमजुरी करून या दोन मुलांचा सांभाळ करीत होती.
कालांतराने सूरजच्या आईला आजार जडला. त्यामुळे ती सतत आजारी असल्याने तिचे जगणे मुश्कील झाले. त्यामुळे ती मावशीकडे रामनगर येथील खोराडी वस्तीवर राहायला आली. पण आजार वाढतच गेल्याने व पैशाअभावी वेळेत उपचार न झाल्याने ती मृत झाली. त्यावेळी सूरज तिसरीत शिकत होता, तर त्याची मतिमंद व अपंग बहीण घरीच होती.
आईच्या मृत्यूनंतर या दोन भावंडांचा सांभाळ आईची मावशी करत होती. पण मावशीला देखील कर्करोगाने गाठले आणि नियतीने चार वर्षांनंतर या भावंडांचे उरलेसुरले छत्रही हिरावून नेले. तिच्या मृत्यूवेळी अंत्यसंस्कारासाठी लागणाºया खर्चासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली. त्यावेळी लिंगनूरमधील काही नागरिकांनी तिच्या अंत्यविधीसाठी आर्थिक मदत केली. अशारितीने मावशीच्या मायेचे छत्रही हरविल्यानंतर अपंग बहिणीची जबाबदारी कोवळ्या लहान सूरजवर येऊन पडली.
सूरज व बहीण पूजा हे झोपडीत दोघेच राहत असल्याने त्यांना शासकीय मदत देऊन त्यांची राहण्याची व इतर सोय करण्यात येणार असून,सामाजिक संस्थांनीही या दोघा भावडांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे. जनाबाई पाटील,सभापती, मिरज पंचायत समिती