संतोष भिसेसांगली : जिल्हा परिषदेचा ऑनलाइन चेहरा असलेल्या संकेतस्थळावर प्रशासनाने अनेक धमाल गमतीजमती करून ठेवल्या आहेत. जिल्ह्याची माहिती अपलोड करताना अगदीच पोरखेळ केला आहे. काही दिग्गज साहित्यिकांचे बाप बदलण्याच्या अक्षम्य चुका करून ठेवल्या आहेत, तर परजिल्ह्यातील काही साहित्यिक आमचेच म्हणून फुशारकी मारली आहे.पुरोगामी आणि प्रगतशील जिल्हा म्हणून मिरवणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या अर्धवट ज्ञानाचे आणि बेजबाबदार वृत्तीचे दर्शन या संकेतस्थळावरून होत आहे.काय घोळ घातलाय?प्रख्यात ग्रामीण कथाकार शंकर पाटील हे सांगलीच्या मातीतले अद्वितीय रत्न असा टेंभा मिरवला आहे. प्रत्यक्षात त्यांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली होय. त्यांच्या वडिलांचे नाव बाबाजी असे होते. जिल्हा परिषदेने बाबाजी ऐवजी खंडू यांनाच शंकर पाटलांचे बाप ठरवले आहे. संकेतस्थळावर नमूद असलेले शंकर खंडू पाटील हे संपादक होते. पण तेदेखील सांगलीचे नाहीत. ग्रामीण कथालेखनामध्येही त्यांचे नाव नाही. फोटो मात्र खऱ्याखुऱ्या ग्रामीण कथाकार शंकर पाटलांचाच ठेवला आहे. या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, हे त्यांच्या गावीही नसावे.
चारुता सागरांचे वडीलही बदललेग्रामीण कथालेखनात अमीट ठसा उमटवणारे चारुता सागर यांचे खरे नाव दिनकर दत्तात्रय भोसले होय. पण जिल्हा परिषदेने वडिलांचे नाव बदलून बाबाजी ठेवले आहे. विद्यापीठात अभ्यासल्या जाणाऱ्या चारुता सागरांचा फोटो ही संकेतस्थळावर माहिती देणाऱ्या बुद्धिवंतांना मिळू नये, यासारखी हतबलता नसावी. अनेक महिन्यांपासून याच नोंदी कायम असून बदलण्याची सद्बुद्धी कोणालाही सुचलेली नाही.
अर्धवट ज्ञानवंतांची अर्धवट मुशाफिरीकाही अर्धवट ज्ञानवंतांनी संकेतस्थळावर फुशारकी मारताना अनेक घोळ घातले आहेत. प्रख्यात लेखक वि. स. खांडेकर यांचे नाव विष्णू सखाराम खाडकर असे नोंदवले आहे. त्यांच्याविषयी नोंदवलेली माहिती अत्यंत असंबद्ध आणि बालिश आहे. नटसम्राट बालगंधर्वांचा जन्म पुण्यात झालेला असताना नागठाणे अशी चुकीची नोंद केली आहे. या सर्व साहित्यिकांना सांगली जिल्ह्याचे म्हणताना त्यांची गावे मात्र नोंदविलेली नाहीत. अण्णा भाऊ साठे यांचे नाव तुकाराम होते याचाही विसर पडला आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकरराव खरात यांचा समावेश ‘साहित्य’ ऐवजी ‘कला’ विभागात करून ठेवला आहे.
जिल्हा परिषदेत मी नव्याने नुकताच रुजू झाल्याने संकेतस्थळ पाहिलेले नाही. संकेतस्थळावर चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याची कार्यवाही करू. - प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग