अंजर अथणीकरसांगली : लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक...आवाजातील भारदस्तपणा...शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ््यांना सजविले आहे. सूत्रसंचालनाची चाळीशी पूर्ण करणाºया श्रीमंत आवाजाचा अत्यंत साधा माणूस म्हणजे विजयदादा कडणे.
प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा मुख्य शासकीय सोहळा आज, शुक्रवारी पोलिस कवायत मैदानावर साजरा होत असताना, विजय कडणे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या जबाबदारीची ४० वर्षे पूर्ण करीत आहेत. राष्ट भावनेने इतकी वर्षे अखंडित सेवा देणारे ते एकमेव निवेदक ठरले आहेत. या सोहळ्याचे वेळ त्यांनी कधीही चुकवलेली नाही. प्रजासत्ताक दिनावेळी ते ना कधी आजारी पडले, ना कधी त्यांचा आवाज बसला, हे विशेष!
‘सांगलीचा आवाज’ म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिध्द आहेत. ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. आज सत्तरीत पोहोचलेले विजय कडणे गेली ४५ वर्षे सूत्रसंचालकाचे काम करत आहेत. दैवज्ञ समाजाचे काम करीत असताना त्यांचा खणखणीत आवाज राजकीय नेत्यांच्या लक्षात आला. त्यानंतर ते सूत्रसंचालन करू लागले. यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही किंवा आवाजासाठी कधी पथ्यपाणी पाळले नाही.
निमंत्रणाच्या ठिकाणी सायकलवरून ते वेळेआधीच तासभर पोहोचतात.प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्टÑदिन हे तीन सोहळे ते अगदी राष्टप्रेरणेने करतात. यासाठी कधीही मानधनाची अपेक्षा ठेवत नाहीत. तेथे ते चहापाणीही घेत नाहीत. ही सेवा देणे म्हणजे राष्ट कर्तव्य समजतात. ४० वर्षापूर्वी ते एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यानी त्यांना ऐकले. त्यानंतर गेली ४० वर्षे त्यांना प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी चार दिवस अगोदर सूत्रसंचालन करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे निमंत्रणपत्र येते. त्यानंतर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ते पोलिस मुख्यालयात जाऊन कार्यक्रमाची माहिती घेतात. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ते संयोजकांशी सल्लामसलत करतात.
गौरव समारंभ, सत्कार, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन ठरवतात. कार्यक्रमाच्या तासभर अगोदरच ते ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतात. टेबलावर कागदांची मांडणी करतात. अनुभवाने त्यांना आता राजशिष्टाचाराची (प्रोटोकॉल) माहिती झाली आहे. त्यामुळे संयोजकांना त्यांना आता काहीच माहिती देण्याची गरज उरलेली नाही. कोणतीही घाईगडबड न करता, सर्वांचे समाधान हेच त्यांचे धोरण असते.