आटपाडी (जि. सांगली) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले असून, त्यांना मी अनेकवेळा त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते बाहेर पडत नसल्याने त्यांना फक्त एक सल्ला दिला आहे की, 'तुम्ही त्या ठिकाणी सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा', अशी मिश्किल टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली.
आटपाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी आठवले बोलत होते. त्यांनी कवितेतून भाषणाला सुरुवात करत आटपाडीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, जर विनाकारण हात लावला कोणी माझ्या गाडीला, तर मी आग लावीन त्यांच्या माडीला.
राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीला विरोध दर्शवत ते म्हणाले की, विनाकारण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करू नका. भोंगे काढण्याची भाषा करू नका. संपूर्ण भारत देश अखंड सर्वधर्मसमभाव जपणारा आहे. भोंगा आवडत नसेल, तर ऐकू नका. संविधानाच्या विरोधात भूमिका योग्य नाही.आठवले म्हणाले, आमचा रिपब्लिकन पक्ष वाद न करणारा व जातीय तेढ निर्माण न करणारा सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र पुढे नेणारा पक्ष आहे. बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना रिपब्लिकन नावाचे वावडे आहे. मी ज्या पक्षासोबत राहतो, त्या पक्षाची सत्ता येते. शिवसेनेने लोकमताचा अनादर करून सत्ता स्थापन केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात माजी महापौर विवेक कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार केंगार, विनोद निकाळजे, सुरेश बारशिंगे, जगन्नाथ ठोकळे, विनोद निकाळजे, अरुण आठवले आदी उपस्थित होते.
शंकरराव खरात स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणारथोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आठवले यांनी सांगितले.