सांगली : येथील माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत होत आहे. यामध्ये होत असलेली कामे अत्यंत उत्कृष्ट असून हे उद्यान नागरिक व लहान मुले यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मंत्री आठवले आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी केली.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, संजय कांबळे, संदेश भंडारे आदी उपस्थित होते. आठवले यांनी उद्यानाच्या कामांची माहिती घेतली. त्यांच्या फंडातून मदतीचे आश्वासन दिले.आमदार गाडगीळ, विवेक कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. नगरसेवक ठोकळे यांनी माता उद्यानाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.उद्यानासाठी सव्वासात कोटींचा खर्चमहापालिकेच्या ३२ हजार चौरस फुट खुल्या भूखंडावर उद्यान विकसीत करण्यात येत आहे. त्यासाठी ७ कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये बाहेरील बाजूस व मध्यभागात २.७ मीटर रूंदीचे वॉकींग ट्रॅक, सुमारे १२ मीटर उंचीचा क्रांतीस्तंभ, महामानवांचे अर्धपुतळे तसेच ध्यान मंदीर, विहार हाऊस व खुला रंगमंच, स्वागत कमानी आदी कामांचा समावेश आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांगली दौऱ्यावर, माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 1:14 PM